भांडुप येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी नागरिकांचे देशवासियांना आवाहन !
आंदोलन करतांना राष्ट्रप्रेमी |
मुंबई-
– चीन पाकिस्तानच्या आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देऊन एकप्रकारे शत्रूराष्ट्राला साहाय्य करत आहे. शत्रूराष्ट्राला साहाय्य करणार्या चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून देशवासियांनी चीनचे आर्थिक कंबरडे मोडून टाकावे, असे आवाहन २२ ऑक्टोबर या दिवशी भांडुप येथील रेल्वेस्थानकावर झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केले. आंदोलनात श्री शिवकार्य प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदू परिषद, भाजप, शिवसेना, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटनांचे पदाधिकारी, मुंबई येथील नेव्ही इंटरनॅशनल मुंबईचे जनरल सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर गुप्ता यांसह ३५ राष्ट्रप्रेमी सहभागी झाले होते.
स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करावा ! – सचिन घाग, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
चीनने विश्वासघात करून भारताचा प्रांत बळकावला आहे. त्यामुळे भारतियांनी चीनच्या वस्तू खरेदी न करता स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करावा. क्रांतीकारकांनी ब्रिटिश काळात परदेशी वस्तूंची होळी केली होती. याचा आदर्श युवकांनी घ्यावा.
देवतांची चित्रे असलेले फटाके फोडून राष्ट्रपुरुष आणि देवता यांचा होणारा अवमान रोखा !
– गणेश पाटील, उपशाखा संघटक, शिवसेना
फटाके फोडल्याने पैशांचा अपव्यय होतो. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने राष्ट्रपुरुष अन् देवता यांचा अवमान होतो. फटाक्यांच्या माध्यमातून होणारा राष्ट्रपुरुष आणि देवता यांचा अवमान रोखा.
फटाके फोडणे, ही ब्रिटीश संस्कृती ! – कुणाल चेऊलकर, हिंदु जनजागृती समिती
फटाके फोडल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दिवाळीच्या काळात फटाके फोडतांना झालेल्या दुर्घटनांमुळे दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. फटाके फोडणे, ही ब्रिटिशांची संस्कृती आहे. फटाके न फोडण्याविषयी देशवासियांमध्ये जागृती करायला हवी.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. सागर चोपदार यांनीही त्यांचे विचार मांडले.
क्षणचित्र – विश्व हिंदू परिषदेचे श्री. गणेश तिवारी कुटुंबियांसह आंदोलनात सहभागी झाले होते.
via Blogger http://ift.tt/2dDwaNA
from WordPress http://ift.tt/2eDgEFb
via IFTTT
No comments:
Post a Comment