मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच वक्तव्य केले की, पाकिस्तान हा जगातील आतंकवादाचा अड्डा आहे. त्यासमवेत त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, भारतातील आतंकवादाचा अड्डा काश्मीर बनलेला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून तेथील आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले, त्याप्रमाणे काश्मीरमधील आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी सर्जिकल हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काश्मीरला कुरुक्षेत्र बनवले पाहिजे, असे प्रतिपादन पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू यांनी केले. काश्मिरी हिंदूंवरील अन्याय आणि आतंकवाद यांच्या विरोधात पनून कश्मीर आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या एक भारत अभियान या राष्ट्रीय चळवळीची माहिती देण्यासाठी २१ ऑक्टोबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर जम्मू फॉर इंडियाचे प्रा. हरि ओम, युथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल, भारत रक्षा मंचचे श्री. अनिल धीर, तमिळनाडू शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन् आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे हे उपस्थित होते. वर्ष १९९० मध्ये झालेल्या अनन्वित अत्याचारांमुळे काश्मिरी हिंदूंना स्वत:च्याच भूमीत विस्थापित व्हावे लागले. मागील २६ वर्षे काश्मिरी हिंदू विस्थापितांचे जीवन जगत आहेत. या विस्थापित हिंदूंचे काश्मीर खोर्यात पुनर्वसन व्हावे, यासाठी उभारण्यात आलेल्या एक भारत अभियानाची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
डॉ. अजय च्रोंगू पुढे म्हणाले, सर्जिकल हस्तक्षेप म्हणजे ज्या ज्या व्यक्ती आतंकवादी विचारधारेचे समर्थन करतात, त्यांच्यावर त्वरित कारवाई करणे आणि जे त्या कारवाईने बधणार नाहीत, त्यांच्या विरोधात लष्करी कारवाई करणे आवश्यक आहे. आतापर्यंतच्या शासनाने आतंकवादाविषयी संरक्षणाची भूमिका घेतली होती; मात्र केंद्रशासनाने केलेले सर्जिकल स्ट्राईक म्हणजे योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे. काश्मीरमधील चुकीचा परिणाम संपूर्ण देशाला भोगावा लागत आहे. काश्मीर ही आतंकवादाची भूमी झाली आहे. शाळा, महाविद्यालये, विविध संघटना आदी माध्यमांतून या विघटनवादी शक्ती कार्यरत आहेत. राज्यशासन आणि केंद्रशासन यांच्याद्वारे या विघटनवादी शक्तींना प्रोत्साहन मिळत आहे. आतंकवादाला नष्ट करण्यासाठी प्रथम या विघटनवादी शक्तींना संपवणे आवश्यक आहे. सर्जिकल स्ट्राईक करून या विघटनवादी शक्तींना संपवले पाहिजे.
काश्मीरमध्ये मुसलमानही रहातात, तर मग काश्मीरमधील आतंकवाद म्हणजे हिंदूंवरील आक्रमण, म्हणजे केवळ हिंदूंवरील आक्रमण कसे म्हणता येईल ? या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना डॉ. अजय च्रोंगू म्हणाले, काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करण्याचा मुख्य उद्देश भारताचे इस्लामीकरण करणे, हा आहे. आतंकवाद्यांनी त्यांचा हा उद्देश कधीही लपवलेला नाही. त्यामुळे काश्मिरी हिंदूंवरील आक्रमण हे देशावरील आक्रमण आहे आणि देशावरील आक्रमण हे पर्यायाने हिंदूंवरील आक्रमण आहे.
via Blogger http://ift.tt/2esAb8q
from WordPress http://ift.tt/2eszKuy
via IFTTT
No comments:
Post a Comment