परभणी येथीलसाहित्यिक व पत्रकार डाॅ आसाराम लोमटे यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाॅ आसाराम लोमटे यांचे अभिनंदन केले आहे.
साहित्य अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक साहित्य अकादमी पुरस्काराची २१ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली. साहित्य विश्वातील अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार म्हणून ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराची ओळख आहे. देशभरातील २४ भाषांमधील विविध साहित्य प्रकारांना हा पुरस्कार दिला जातो. मराठीतील लघुकथांसाठी साहित्यिक डाॅ आसाराम लोमटे लिखित ‘आलोक’ या कथासंग्रहाची निवड यंदा पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
आपल्या अभिनंदनपर संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, डाॅ आसाराम लोमटे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध प्रश्नांचा पाठपुरावा करतानाच साहित्याच्या माध्यमातूनही ग्रामीण समाजजीवन चितारण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. साहित्य अकादमीसारख्या प्रतिष्ठित संस्थेकडून जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाॅ आसाराम लोमटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून श्री लोमटे यांच्या भावी लेखनप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डाॅ आसाराम लोमटे हे परभणीतील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक असून ग्रामीण जीवनावर भाष्य करणारा ‘आलोक’ हा त्यांचा दुसरा कथासंग्रह आहे. ‘आलोक’ या कथासंग्रहाच्या माध्यमातून डाॅ आसाराम लोमटे यांनी ग्रामीण विश्वाचे वास्तव लोकांसमोर मांडले आहे. नातेसंबंध, माणसाचा जगण्यासाठीचा संघर्ष ‘आलोक’मधील प्रत्येक कथांमधून डोकावतो. याशिवाय लोमटे यांनी लिहिलेला ‘इडा पीडा टळो’ हा कथासंग्रहदेखील तितकाच चर्चिला गेला आहे.
डाॅ आसाराम लोमटे यांना यापूर्वीही पत्रकारितेतील तसेच साहित्य क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानाबद्दल अनेक नामवंत संस्थांकडून विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एका विशेष कार्यक्रमात साहित्य अकादमीचा हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून १ लाख रुपये, ताम्रपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अशी माहिती साहित्य अकादमीतर्फे देण्यात आली आहे.
via Blogger http://ift.tt/2hl92cC
from WordPress http://ift.tt/2ibqtcn
via IFTTT
No comments:
Post a Comment