Latest News

पाताळगंगा येथील एनआयएसएमच्या नवीन संकुलाचे उद्घाटन भांडवली बाजारातून संपत्ती निर्माण नव्हे तर नागरिकांचे कल्याण व्हावे; बॅाण्डसच्या माध्यमातून शहरांच्या विकासासाठी निधी मिळावा — पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी मुंबई -: 


मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करणे हे भांडवली बाजाराचे उद्दिष्ट्य नसावे तर राष्ट्र उभारणी आणि नागरिकांचे यातून कल्याण व्हावे. राज्यातील किमान १० स्मार्ट शहरे म्युनिसिपल बॅाण्डसच्या माध्यमातून विकसित व्हावी तसेच शेतकऱ्यांना देखील वित्तीय बाजाराचा लाभ मिळावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते आज सेबीच्या राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्थान (एनआयएसएम)च्या नव्या संकुलाचे उद्घाटन करतांना बोलत होते. 
याप्रसंगी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अरुण राम मेघवाल यांची उपस्थिती होती. पाताळगंगा ( रायगड) औद्योगिक वसाहतीतील एनआयएसएम नव्या संकुलाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. 
देशातील भांडवली ( वित्तीय) बाजाराकडून असलेल्या आपल्या अपेक्षा व्यक्त करतांना पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले की, मी नेहमी आयपीओना चांगला प्रतिसाद मिळाला आणि ते यशस्वी झाले असे ऐकतो. पण माझ्या दृष्टीने केवळ प्रमुख उद्देश हा मोठी संपत्ती निर्माण व्हावी असा अपेक्षित नाही, तर खऱ्या अर्थाने भांडवली उत्पादकता वाढली पाहिजे. आपल्याकडे नेहमी सरकार आणि बँका, वित्तीय संस्था या पायाभूत सुविधांसाठी अर्थसहाय्य करतात. मात्र हाच पैसा दीर्घकाळासाठी भांडवली बाजारातून मिळाला तर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा देशात तयार होतील. आमच्या सरकारने देशातील शहरे सुधारण्यासाठी चांगली योजना आणली आहे. मात्र मी अद्यापपर्यंत तरी भांडवली बाजारातून शहरांच्या सुविधेसाठी पैसा उपलब्ध झाल्याचे पाहिले नाही. देशातील किमान १० स्मार्ट शहरांसाठी तरी असे बॉंड निघावेत अशी अपेक्षा आहे.
कृषी क्षेत्राला देखील या भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा लाभ मिळाला तर यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम पार पाडता येतील आणि त्याचा फायदा शेतकरी आणि ग्रामस्थांना होईल असे सांगून,पंतप्रधानांनी इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चरल मार्केट (इनाम) उल्लेख केला.कमोडीटी मार्केट मधून शेतकऱ्यांसह देशालाही अपेक्षा आहे असे ते म्हणाले. 
 सेबीने अधिक दक्ष राहण्याची गरज प्रतिपादन करून पंतप्रधान म्हणाले की, या भांडवली बाजारातून कराच्या स्वरूपात पुरेसा पैसा सरकारकडे जमा होत नाही. कदाचित हा कर प्रणालीतील काही त्रुटींचा भाग असू शकतो, पण आपल्याला प्रामाणिक, परिणामकारक आणि पारदर्शी व्यवस्था निर्माण करायची आहे. जेणे करून एक जागतिक दर्जाचा भांडवली बाजार निर्माण होऊन तो देशाला विकासाकडे घेऊन जाऊ शकतो. 
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नुकत्याच उचललेल्या पावलांचा उहापोह केला. ते म्हणाले की, वित्तीय तुट प्रचंड प्रमाणात वाढली होती, रुपयाचे देखील अवमूल्यन झाले होते, जगात देशाची आर्थिक पत घसरली होती. परकीय गुंतवणूकदार देशात गुंतवणूक करण्यास तयार नव्हते. आम्ही तीन वर्षांपेक्षाही कमी काळात वित्तीय चित्र बदलवण्यास सुरुवात केली. परकीय चलन वाढले, रुपया वधारला, चलन फुगवटा कमी झाला. सार्वजनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली. आता तर वस्तू व सेवा कर लागू करण्यातले काही अडथळे दूर करून लवकरच नवी कर प्रणालीही लागू होईल. ईज ऑफ डुईंग बिझिनेसमुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदार परत एकदा आपल्या देशाकडे वळले. विक्रमी अशी परकीय गुंतवणूक देशात व्हायला सुरुवात झाली. चलनबंदीच्या आमच्या निर्णयाची तर विरोधकांनी देखील प्रशंसा केली आहे. आम्ही कुठल्याही राजकीय लाभासाठी नव्हे तर देशासाठी दीर्घ काळ फायद्याचे ठरेल असे आर्थिक धोरण राबवीत आहोत.
देशातील युवा शक्ती ही आमची ताकद असून सेबीने एनआयएसएमच्या माध्यमातून भांडवली बाजारातील गुंतवणूक आणि संबंधित इतर प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरु केल्याबद्धल पंतप्रधानांनी सेबीचे अभिनंदन केले. ५ लाख प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना देण्याचे उद्दिष्ट्य ठेऊन संस्थेने या तरुणांना या महत्वाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी दिली आहे असेही पंतप्रधान म्हणाले. 
या प्रसंगी बोलतांना केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली म्हणाले की, आम्ही काही महत्वाच्या वित्तीय सुधारणा करून गुंतवणूकदाराचा विश्वास परत मिळवला आहे. आधारचा विविधांगी उपयोग, वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करणे, चलनबंदी ही त्यातली काही पावले आहेत.

via Blogger http://ift.tt/2hmhg3T




from WordPress http://ift.tt/2hbXgfG
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.