काचबिंदूमुळे कायमची दृष्टी जाण्याचा धोका असतो. त्यामुळे काचबिंदूवर वेळीच उपचार करावा. अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत काचबिंदू या आजाराबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जागतिक काचबिंदु सप्ताहानिमित्ताने काचबिंदुची माहिती सांगणारा हा लेख.
काचबिंदु
डोळा अचानक दुखू लागणे, लाल होणे व दृष्टी कमी होणे.
डोळ्यात असणारा ताण वाढला असता डोळा अचानक दुखू लागतो, तसेच डोळा लाल होतो आणि दृष्टी अचानक कमी होऊ लागते. नेत्र रोगातील काचबिंदु हा एकमेव रोग असा आहे, की ज्यावर तातडीने उपचार न केल्यास डोळा जाण्याची शक्यता आहे.
काचबिंदू कोणाला होउ शकतो.
आपले वय ४० वर्षापेक्षा जास्त असेल. आपल्या चष्म्याचा नंबर वारंवार बदलत असेल, आपल्या घरात कोणाला आधीपासून काचबिंदू असेल, डायबेटीज, ब्लडप्रेशर असेल, दृष्टी संकुचित होत असेल. यापैकी कोणताही त्रास होत असेल, तर काचबिंदू असण्याची शक्यता आहे. या आजाराबाबत वेळेवर तपासणी आणि औषधोपचार केला नसल्यास कायमची दृष्टी जाण्याचा धोका संभवतो.
डोळ्यांची काळजी घ्या
भारतातील अंधत्वाच्या प्रमुख कारणांपैकी काचबिंदू हे एक प्रमुख कारण आहे. डोळ्याच्या आतील दबाव वाढणे व डोळ्याची मुख्यप्रकाश संवेदना वाहून नेणारी नस खराब होते. ही प्रक्रिया हळुवार होते यामध्ये रोग्याला विशेष त्रास होत नाही. परंतु नजर कमी झाल्यावर काचबिंदूवरील उपचारांचा फायदा होत नाही.
प्रमुख लक्षणे
काचबिंदूमुळे रोग्याला विशेष त्रास होत नसला, तरी काही लक्षणे या रोगाची कल्पना देतात. जसे की वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे. आजूबाजूची नजर कमी होणे. गाडी चालवितांना बाजूचे न दिसणे. प्रकाश दिव्याभोवती इंद्रधनुष्यासारखे बलय दिसणे. डोके दुखणे आदी. मधुमेही वयस्कर व कुटुंबात काचबिंदू असताना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्याची तपासणी होणे गरजेचे आहे.
काचबिंदूचे निदान कसे कराल
मधुमेह, ४० वर्षावरील व्यक्ती, कुटुंबात काचबिंदू असणाऱ्यांनी डोळ्याची तपासणी नियमित करून घ्यावी.
उपाय
जर काचबिंदूचे निदान योग्यवेळी झाले, तर त्यावर उपचार करणे शक्य आहे. डोळ्यात टाकले जाणारे ड्रॉप्स, डोळ्याच्या आतील द्रव कमी करतात व त्याद्वारे पुढील हानी टाळता येते. आय ड्रॉपचा उपयोग नेहमी करावा. ज्याद्वारे अंधत्व टाळता येईल. लेसर किरण किंवा शस्त्रक्रियेद्वारे काचबिंदूवर उपचार करता येतो. नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने काचबिंदूमध्ये उपचार करावे, हे लक्षात ठेवावे की काचबिंदूच्या उपचाराने नजर वाढणे शक्यच आहे. परंतु पुढील नजरेची हानी आणि अंधत्व टाळणे शक्य आहे. भारतात दीड कोटी लोकांना काचबिंदू आहे. त्यापैकी अर्धेअधिक लोकांना ते या रोगाने पिडीत असल्याची कल्पनासुद्धा नाही.
या रोगाची लक्षणे सुरूवातीच्या काळात दिसत नाहीत. सद्या जगात ६.६ कोटी लोक या रोगाने त्रस्त आहेत. भारतातील १३ टक्के अंध काचबिंदूमुळे आहे. १२ ते १८ मार्च हा जागतिक काचबिंदु सप्ताह म्हणून साजरा केला जातो. सर्वसामान्य नागरीकांत या रोगाची माहिती देणे आणि त्याचे प्रारंभिक अवस्थेत निदान करणे हा उद्देश आहे
काचबिंदु कसा टाळाल
कोणत्याही आजारावरील उपचाराची सुरूवात ही जीवन शैलीमधील बदलाने होते. काचबिंदूही त्याला अपवाद नाही. परंतु जीवन शैलीतील बदलाने विशिष्ट आजार बरा होत नसेल, तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. काचबिंदूच्या उपचारामध्ये यश व शाश्वती किती हा प्रश्न कायम विचारला जातो. निदान किती लवकर झाले, आजार कोणत्या टप्प्यात आहे, व्यक्तीची जीवनपद्धती व इतर धोकादायक आजार या सर्व गोष्टींवर हे अवलंबुन असते. सर्वसाधारणपणे पहिल्या टप्प्यातील आजार थांबविता येतात, मध्यम टप्प्यातील आजारांची प्रगती थांबविता येते आणि तिसऱ्या टप्प्यातील आजारामुळे येणारे अंधत्व लांबविता येते. तरीही ५ टक्के रूग्णांमध्ये अपयश शक्य आहे. काचबिंदु होण्याचे नेमके एकच कारण नसते आणि त्यातील काही कारणांवर आपण पुर्ण उपचार करू शकत नाही.
जीवनपद्धती
जीवनपद्धती बदलविणे हे सर्वांगीण आरोग्याबरोबरच काचबिंदूसारख्या आजारात निश्चितच उपयुक्त आहे. हे शास्त्रीय पाहणीत सिद्ध झाले आहे. झोप, व्यायाम, फळे, पालेभाज्यायुक्त शाकाहारी आहार, नैसर्गिक जीवनसत्वांचा समावेश, धुम्रपान, दारू, तंबाखू आणि तत्सम व्यसनाधिनता डोळ्यांच्या शिरेचा नाश करते. त्यामुळे कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही. मानसिक ताणतणावाचा डोळ्यांच्या शिरेच्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. रक्तवाहिन्यांतील चरबीमुळे रक्तपुरवठा असुरक्षित होतो. हे लक्षात ठेवले पाहिजे.
शस्त्रक्रियेचा पर्याय
ज्या रूग्णांचा अंतर्दाब नियमीत औषधाने आटोक्यात राहात नाही, जे रूग्ण औषध नियमीत टाकु शकत नाही किंवा ज्यांना तपासणीला नियमीत येणे अशक्य आहे आणि दृष्टी हळूहळू कमी होतेय, अशा रूग्णांवर शस्त्रक्रिया करणे जरूरीचे असते. शस्त्रक्रियेचा फायदा असा की, डोळ्यातील दाब कमी करण्याचा सुक्ष्म अंतर्गत मार्ग तयार केला जातो. त्यामुळे दाब कायम कमी राहू शकतो.
via Blogger http://ift.tt/2nDS7jR
from WordPress http://ift.tt/2nrPeDG
via IFTTT
No comments:
Post a Comment