Latest News

 रिसोड येथे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा

जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन जैन

वाशिम,  : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुद्रा योजनेतून सहज व कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याने ही योजना स्वतःचा लघु उद्योग उभारण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. गरजू, होतकरू बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेऊन आपला उद्योग, व्यवसाय सुरु करावा, असे आवाहन तहसीलदार अमोल कुंभार यांनी केले. जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व रिसोड तहसीलदार कार्यालयाच्यावतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी विजय खंडरे होते.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विजय नगराळे, अलाहाबाद बँकेचे व्यवस्थापक प्रदीपकुमार मिश्रा, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सौरभ देशमुख, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते.

तहसीलदार श्री. कुंभार म्हणाले की, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून लघु व्यवसाय व उद्योग उभारणीसाठी तसेच ते त्यांचा विस्तार करण्यासाठी कर्ज उपलब्ध करण्यात येते. या योजनेविषयी युवकांना माहिती मिळावी, याकरिता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातून माहिती प्राप्त करून घेऊन, आपल्या व्यवसायाची निवड करून बँकेकडे परिपूर्ण अर्ज सादर करावा. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज प्राप्त करून घेऊन आपला उत्कर्ष साधण्यासाठी प्रयत्न करावा.

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. नगराळे म्हणाले, जिल्ह्यातील होतकरू बेरोजगार युवक-युवतींना प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून मुद्रा कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मुद्रा योजनेची माहिती पोहचविणे हा मेळाव्यांचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुद्रा योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

नाबार्डचे श्री. खंडरे यांनीही यावेळी उपस्थितांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बेरोजगार, होतकरू युवकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे युवकांनी समाजाची गरज ओळखून व्यवसायाची निवड करावी व त्यानुसार उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी बँकेकडे अर्ज सादर करावा. मुद्रा योजनेतून लघु उद्योगांना कर्ज देण्यात येते. यामाध्यमातून व्यवसायाची सुरुवात करून टप्प्या-टप्प्याने आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करा. शासकीय स्तरावरून उद्योगांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यात येत असून सदर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी अलाहाबाद बँकेचे व्यवस्थापक श्री. मिश्रा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन व्यवसाय सुरु केलेल्या अल्ताब हुसेन व विशाल राठोड या युवकांनीही यावेळी आपले अनुभव कथन केले. तसेच प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळाल्याने व्यासायात कशाप्रकारे वृद्धी झाली, हे उपस्थितांना सांगितले.

via Blogger http://ift.tt/2nxxb1E




from WordPress http://ift.tt/2nGZuvl
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.