Latest News

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते आणि संवादावर उपचारांचे यश अवलंबून – राज्यपाल राज्यपालांच्या हस्ते डॉ. नागेश्वर रेड्डी यांना धन्वंतरी पुरस्कार प्रदान

मुंबई :-
 डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते त्यांच्यातील संवादावर आणि डॉक्टरांनी रुग्णांवर केलेल्या उपचारांवर अवलंबून असते. डॉक्टरांनी रुग्णांच्या प्रती संवेदनशीलता, ममत्व दाखविणे जितके आवश्यक तितकेच रुग्णांनी डॉक्टरांविषयी विश्वास दाखविणे महत्वाचे आहे. असे असेल तरच दोघांमधील नाते परस्पर विश्वासाचे, मैत्रीपूर्ण होऊ शकेल, आणि उपचार यशस्वी होतील असे प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज येथे केले. पद्मविभूषण डॉ. नागेश्वर रेड्डी यांना राज्यपालांच्या हस्ते धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. नागेश्वर रेड्डी, धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे डॉ. बी. के. गोयल, डॉ. जिवराज शहा, वैद्य सुरेश चतुर्वेदी, डॉ. लेखा पाठक आदी उपस्थित होते. धन्वंतरीची मूर्ती, सुवर्णपदक आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.
राज्यपाल म्हणाले की, कुठल्याही वैद्यकीय उपचारांची यशस्विता ही डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यावर अवलंबून असते. त्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात परस्परांविषयी विश्वास महत्त्वाचा असतो. डॉक्टरांनी त्यांच्या कौशल्याचा उपयोग रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी केला पाहिजे. सध्याच्या निवासी डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शासनाने वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात मानवता हा विषयसुद्धा ठेवावा असेही राज्यपाल यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
श्री. राव म्हणाले की, डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी गॅस्ट्रोइंट्रोलॉजी आणि एन्डोस्कोपी क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे. त्यांचा अभ्यास आणि संशोधनामुळे हैदराबाद येथे जागतिक दर्जाचे गॅस्ट्रोइंट्रोलॉजीचे केंद्र उभे राहू शकले. त्यांच्या प्रयत्नामुळे सामान्य माणसांना किफायतशीर दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकल्या आहेत. डॉ.रेड्डी यांच्या प्रयत्नांमुळेच हैदराबाद वैद्यकीय क्षेत्रात जगाच्या नकाशावर येऊ शकले.
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन म्हणाले की, डॉ. रेड्डी यांना पुरस्कार दिल्याने धन्वंतरी पुरस्काराचे मूल्य वाढले आहे. वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकीय कौशल्यासोबत संवादही आवश्यक असतो. तरुण डॉक्टरांनी डॉ. रेड्डी यांचा आदर्श ठेवून काम करायला हवे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. रेड्डी म्हणाले की, मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी तिथेच व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता, मात्र मी भारतात येऊन संशोधन करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद येथे येऊन गॅस्ट्रोइंट्रोलॉजीचे केंद्र उभारले. काही दिवसांपूर्वी त्याच प्राध्यापकांनी पत्र लिहून माझा निर्णय बरोबर होता असे सांगितले यातच सर्व काही आले. भारतात वैद्यकीय संशोधनासाठी प्रचंड संधी आहेत, असेही ते म्हणाले. आज मिळालेला धन्वंतरी पुरस्कार माझा नसून माझ्या गुरुजनांचा, सहकाऱ्यांचा आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टरांचा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला धन्वंतरी पूजन आणि धन्वंतरी वंदना झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ट्विंकल संघवी यांनी केले तर आभार प्रदर्शन धन्वंतरी फाउंडेशनचे सचिव डॉ. जिवराज शहा यांनी केले.

via Blogger http://ift.tt/2nkputg




from WordPress http://ift.tt/2ojN6gQ
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.