युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय अथवा उद्योग सुरु करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज ही संधी असून या संधीचा लाभ घेऊन जीवनात परिवर्तन घडवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात युथ एम्पॉवरमेट समिट अंतर्गत प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज मेळावा व युवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. तर आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, डॉ.मिलिंद माने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यावेळी उपस्थित होते.
युवकांनी नोकरी संदर्भात असलेली मानसिकता बदलण्याचे आवाहन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री योजनेअंतर्गत नागपूर जिल्हयात राज्यात सर्वाधिक 2 लाख 75 हजार 388 खातेधारकांना 925 कोटी 5 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत युवकांनी कर्जांच्या प्रत्येक रुपयाचे महत्व ओळखून यशस्वी उद्योजक व्हावे व कर्ज व्याजासह परत करण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत विविध राष्ट्रीयकृत बँकाच्या माध्यमातून प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ देण्यासाठी कर्ज मेळावा आयोजित केला आहे. युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांनी केलेल्या कार्याचे यावेळी कौतुक केले.
पालकमंत्र्यांची पंतप्रधान मुद्रा कर्ज दालनास भेट
युथ एम्पॉवरमेंट समिट अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या युवकांसाठी विविध उद्योग मार्गदर्शन तसेच प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज मेळावा दालनास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन युवकांना उद्योग सुरु करण्यासाठी विविध बँकातर्फे सुरु असलेल्या मार्गदर्शन उपक्रमामध्ये युवकांशी संवाद साधला.
ग्रामीण तसेच शहरी भागातील कौशल्य मिळवून उद्योग सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन उद्योगाला सुरुवात करावी. बँकानीही उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांना प्रोत्साहन द्यावे अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
जिल्हयातील 22 राष्ट्रीयकृत व खाजगी बँकानी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मंजूर केलेल्या पैंकी प्रातिनिधिक स्वरुपात 250 युवकांना कर्ज मंजूरीचे आदेश तसेच प्रत्यक्ष कर्जाचे वाटप यावेळी करण्यात आले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने लोकराज्य मासिकाच्या दालनात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून युवकांना पोहोचविण्याच्या उपक्रमाचे विशेष कौतूक केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या कर्जांसाठी आवश्यक असलेली माहिती व कर्ज मागणी अर्ज युवकांना उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध बँकाच्या दालनास भेट देऊन बँकातर्फ राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, युको बँक, युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, विजया बँक, बँक ऑफ इंडिया, देना बँक, बँक ऑफ बरोडा, सेंट्रल बँक आदी बँकाच्या मुद्रा योजना कर्ज मंजूरी आदेशाचे वितरण यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, जयप्रकाश गुप्ता तसेच विविध कंपन्यांचे विशेष कार्य अधिकारी आदी उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2npB3Rn
from WordPress http://ift.tt/2n5Dmpr
via IFTTT
No comments:
Post a Comment