फुकटात पिक्चर पाहू न दिल्याने एकाने चक्क वैष्णवी टुरींग टॉकीज जाळल्याची घटना बुधवारच्या रात्री साडे नऊ वाजता घुईखेड या गावी घडली. विनोद रमेश ठोंबरे (वय २७) रा.घुईखेड असे त्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, श्री संत बेंडोजी महाराज यात्रेनिमित्त घुईखेड येथे वैष्णवी टूरींग टॉकीज आली होती. या टॉकीजचे दररोज शो सुरू होते. बुधवारी (ता.१५) नेहमी प्रमाणे ‘ रईस ‘ पिक्चर चा रात्रीचा पहिला शो संपल्यानंतर नऊ वाजता दुसरा शो ची तिकीट विक्री सुरू होती. पन्नासजन पिक्चर पाहण्यासाठी आले होते. अशातच आरोपी विनोद रमेश ठोंबरे याने टूरींग टॉकीजच्या मालकाच्या मुलाला तिकिट न काढता पिक्चर पाहू दे अन्यथा तुझी टॉकीज जाळून टाकीन अशी धमकी दिली. त्यावर टॉकीजच्या मालकांच्या मुलाने त्यांना असे करू नको म्हणून विनंती केली. अशातच रात्रीचा दुसरा शो सुरू झाला. आरोपी विनोद ठोंबरे याने साडे नऊ वाजता दरम्यान वैष्णवी टॉकीजच्या मागच्या पडद्याला आग लावली. क्षणात टूरींग टॉकीजच्या सर्व कापडी पडद्यांनी पेट घेतला. यामध्ये वैष्णवी टूरींग टॉकीजचे संपूर्ण तंबु, साईडचा पडदा व स्क्रिन व मशिनचा अॅम्प्लीफायर जळून खाक झाले. यामध्ये टॉकीजचे ४ लाख ३१ हजार रूपयाचे नुकसान झाले. या धक्क्यामूळे वैष्णवी टुरींग टॉकीजचे मालक संतोष रामभाऊ आखरे (वय ४५) रा.पेठपुरा ,मोर्शी यांची प्रकृती बिघडली. त्यांना चांदूर रेल्वेच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. फिर्यादी संतोष आखरे यांच्या तक्रारी वरून तळेगाव दशासर पोलीसांनी विनोद रमेश ठोंबरे यांना रात्री दीड वाजता अटक करून भादंवि कलम ४३५, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
via Blogger http://ift.tt/2kNNOSp
from WordPress http://ift.tt/2kWDhXc
via IFTTT
No comments:
Post a Comment