Latest News

पिक विमा योजनेत सहभागासाठी मुदतवाढ 10 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावे लागणार

मोईन खान /सैय्यद मुजीबोद्दीन


यवतमाळ : –




जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2016-17 साठी राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंत कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 10 जानेवारी असून उन्हाळी भुईमुगासाठी 31 मार्च 2017 आहे.

नैसर्गिक आपत्ती, किडी आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते. तसेच शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देण्यात येते. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, कृषि क्षेत्रासाठ्याच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे आदी उद्देश या योजनेत ठरविण्यात आले आहे.

या विम्यात रब्बी आणि उन्हाळी हंगामातील बागायत व जिरायत गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग पिके समाविष्ट करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी गहू बागायतीसाठी 402.60 रूपये, गहू जिरायतीसाठी 450 रूपये, हरभरा 360 रूपये, उन्हाळी भुईमूगासाठी 237.60 रूपये विम्याचा हप्ता आकारण्यात येणार आहे. यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, मुंबई नेमण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदाराचे व्यतिरिक्त कुळांने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यसाठी शेतकऱ्यांनी भरावयचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे. जोखिमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के राहणार आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील सात वर्षांचे सरासरी उत्पनन नैसर्गिक आपत्ती जाहिर झालेली दोन वर्षे वगळून गुणिले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाणार आहे.

जोखमींच्या बाबींमध्ये जोखमींची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यात पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट, हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी झाली नसल्यास होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान या बाबी समाविष्ट करण्यात आले आहे.

ही योजना क्षेत्र हे घटक धरून राबविण्यात येणार आहे. पिकनिहाय अधिसूचित विमा क्षेत्र घटक म्हणजेच मंडळ किंवा मंडळ गट आणि तालुका किंवा तालुका गट राहणार आहे. पिक उत्पन्नाचा अंदाज काढणेसाठी प्रत्येक पिकासाठी घेण्यात येणाऱ्या प्रस्तावित विमा क्षेत्र घटक व त्यानुसार नियोजित पिक कापणी प्रयोगाची संख्या निर्धारीत क्षेत्र निहाय राहणार आहे. पिक कापणी प्रयोगाद्वारे मिळणारे उत्पन्नाचे अंदाज हे अचूक व दिलेल्या काल मर्यादेच्या प्राप्त करण्यासाठी उपग्रहाद्वारे प्राप्त प्रतिमांच्या सहाय्याने पिक कापणी प्रयोग आयोजित करणे तसेच पिकांच्या उत्पन्नाच्या अंदाजासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्याच्या सुचना केद्र शासनाने केल्या आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे

via Blogger http://ift.tt/2j6sVof




from WordPress http://ift.tt/2i86g6P
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.