यवतमाळ /—
यवतमाळजिल्ह्यात येत्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर उमेदवारांनी शपथपत्रामध्ये दिलेल्या माहितीचा गोषवारा फ्लेक्सद्वारे प्रदर्शित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जगेश्वर स्वरूप सहारिया यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, निवडणूक सचिव शेखर चन्ने, अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीन बिहारी, विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.
सुरवातीला निवडणूक आयुक्त श्री. सहारिया यांनी जिल्ह्यातील निवडणुकीसंदर्भात माहिती जाणून घेतली. निवडणुकीअनुषंगाने उमेदवारांनी भरावयाची ऑनलाईन अर्ज, शपथपत्र आदींबाबत माहिती मोठ्या प्रमाणावर संबंधितांना अवगत करण्यासाठी प्रशिक्षण घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नगर पालिकेच्या निवडणुकीत ऑनलाईन अर्जाला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे अर्ज फेटाळण्याचे प्रकार कमी झाले आहे. निवडणुकीच्या अनुषांगाने आवश्यक असलेल्या सर्व समित्या स्थापन करण्यात आली आहे. भरारी पथकांची निर्मिती करण्यात आले असून येत्या काळात या सर्वांचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू होणार आहे. निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहे. तसेच जिल्ह्यातील संवेदनशिल भागात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात येणार असून निवडणुका पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
या निवडणुकीच्या अनुषांगाने काही महत्त्वाचे पावले निवडणूक आयोगाने उचलली आहे. यामध्ये उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबतच एबी फॉर्म द्यावे लागतील. त्यासोबतच उमेदवारांनी शपथपत्रात दिलेली संपत्ती आणि गुन्ह्यांच्या माहितीचा गोषवारा प्रत्येक मतदान केंद्राबाहेर लावण्यात येतील. निवडणुकीसंदर्भात नागरीकांना तक्रारी करावयाच्या असल्यास त्यासाठी कॉप ॲप हे ॲप तयार करण्यात आले आहे. यातून केलेल्या तक्रारी थेट पोहोचण्यास मदत होईल. निवडणुकांमध्ये नोंदणीकृत पक्षांना समान चिन्ह मिळण्यासाठी त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तीन दिवस अगोदर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे. पंचायत समितीमध्ये पाच टक्के किंवा एक उमेदवार निवडून आलेला असल्यास चिन्ह आरक्षित करून त्यांना समान चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मद्य, पैसा किंवा वस्तूंचा वापर मतदारांना देण्यासाठी होणार नाही, यासाठी बँक, आयकर अधिकारी यांचीही मदत घेण्यात येणार आहे. धर्म, जातीच्या आधारे मतदान मागता येणार नाही. तसेच धार्मिक स्थळांचा वापर करता येणार नाही. अशा प्रकारची तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात येत असून पालिका क्षेत्रातील पोस्टरही तातडीने काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 84 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निवडणूक पुर्णत: निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली असल्याचे श्री. सहारिया यांनी सांगितले.
via Blogger http://ift.tt/2kfxLfj
from WordPress http://ift.tt/2k4u2lF
via IFTTT
No comments:
Post a Comment