वाशिम, दि. १५ : ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक आहे. ग्राहकांचे शोषण व फसवून रोखण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. या कामाला गती मिळण्यासाठी ग्राहकांनी जागृत होण्याची आवश्यकता असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय व ग्राहक पंचायत यांच्यावतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे वाशिम जिल्हाध्यक्ष प्रमोद गंडागुळे, सह संघटक प्रा. सुधीर घोडचर, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेश गिरी, कैलास वानखडे आदी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे म्हणाले की, ग्राहकांची फसवणूक होण्याचे अनेक प्रकार आपल्याला पहावयास मिळतात. अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून अन्न पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न होतात. तसेच वैधमापन विभागामार्फतही ग्राहकांची फसवणूक केली जाऊ नये, याची काळजी घेतली जाते. ग्राहकांनी स्वतःही याविषयी जागृत होऊन आपले हक्क व अधिकारांची माहिती घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत भेसळरोखण्यासाठी धडक मोहीम उघडावी. यामध्ये होणाऱ्या कारवाईला व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
प्रा. घोडचर यांनीही यावेळी अन्न पदार्थामधील भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती पीपीटीद्वारे समजावून सांगितल्या. तसेच श्री. गंडागुळे यांनी ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक पंचायत करीत असलेल्या कार्यांची माहिती दिली. तसेच ग्राहक संरक्षण समितीची कार्यपध्दती विषद केली.
जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्राहक प्रबोधनासाठी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, वैध मापन विभाग, अन्न व औषध प्रशासन, महावितरण, ग्राहक पंचायत, पेट्रोलपंप व गॅस वितरक यांच्यावतीने स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. यावेळी ग्राहक पंचायतीने तयार केलेल्या माहिती पत्रिकेचे विमोचन अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
via Blogger http://ift.tt/2npKKAM
from WordPress http://ift.tt/2n1N13R
via IFTTT
No comments:
Post a Comment