Latest News

शाश्वत शेती आणि सामाजिक संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने कार्य करावे – राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – 

देशाच्या विकासदरात उच्च शिक्षणाचा मोठा सहभाग असून शाश्वत शेती आणि सामाजिक संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केले.



मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात विशेष दीक्षांत समारंभ झाला. या समारंभात हरितक्रांतीचे जनक डॉ. एम .एस. स्वामीनाथन यांना राष्ट्रपतीच्या हस्ते डी.लिट पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कुलसचिव अनिल पाटील, सिनेट सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले की, विद्यापीठाने औद्योगिक क्षेत्राचा अभ्यास करुन  विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल करुन कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत. डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्किल इंडियाच्या माध्यमातून जलद गतीने विकास करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाबरोबरच सकस अन्न निर्मिती करणे गरजेचे असून त्यावर संशोधन करणे आवश्यक आहे. तसेच जागतिक  इको सिस्टीमचा अभ्यास करुन नवनिर्मितीसाठी संशोधन करावे. ते मानवाच्या आनंदासाठी सहाय्यभूत ठरेल. नवीन ज्ञाननिर्मिती, संशोधन आणि कुशल मनुष्यबळ हे देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यासाठी  संशोधनावर अधिक भर दिला पाहिजे, असेही मुखर्जी यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या विद्यापीठातील दर्जेदार शिक्षणामुळे अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी देशाच्या विविध क्षेत्रात कार्य करत आहेत. यापूर्वी आर.जी भंडारकर, दादाभाई नौरोजी, सी. व्ही,रमण आणि एम. विश्वेशवरय्या यांच्या सारख्या  समाजसुधारकांना ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. या सर्वांनी विविध क्षेत्रामध्ये क्रांतीकारी बदल घडवून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बाजवली आहे. डॅा. स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. गेली ६५ वर्ष त्यांनी कृषी क्षेत्रात महत्वाचे संशोधन केले आहे. कृषी बरोबरच अन्न सुरक्षा क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. असे गौरवोद्गगार मुखर्जी यांनी यावेळी काढले. डॅा. स्वामीनाथन म्हणाले की, आदिवासी भागातील कुपोषण ही गंभीर समस्या असून कुपोषण कमी करण्यासाठी विद्यापीठाने विशेष प्रयत्न करावेत. आदिवासी भागात विद्यार्थ्यांनी जाऊन सामाजिक संशोधनावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात आणि समारोप राष्ट्रगीताने  झाला.

via Blogger http://ift.tt/2mDiAhz




from WordPress http://ift.tt/2nhyWjw
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.