कर्जमाफी दिल्यानंतरही शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची गॅरंटी विरोधी पक्ष घेणार का ? या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात दुष्काळ पडणार नाही, अवकाळी पाऊस होणार नाही, शेतीला 24 तास पाणी मिळेल, बोगस बियाणं विकली जाणार नाहीत, शेतीमालाला उत्पादनखर्चावर पन्नास टक्के दर मिळेल याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिली, तर राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची गॅरंटी विरोधी पक्ष घेईल, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी सरकारला सुनावले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर आज नवव्या दिवशीही धनंजय मुंडे यांनी सभागृहात आक्रमक बाजू मांडली. मुंडे यावेळी म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितलं, त्यानंतर ते विधान परिषदेत आले नाहीत. विधान परिषदेत निवेदन न करुन त्यांनी सभागृहाचा अवमान केला आहे. त्यांचं कालचंच लिखीत निवेदन ऐकण्यात आम्हाला रस नाही, असे सांगून निवेदनाशी आपण असहमत असल्याचे स्पष्ट केले. मुंडे पुढे म्हणाले की, केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी लोकसभेत निवेदन करुन उत्तरप्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास केंद्राची अनुकुलता दर्शवली परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबाबतचा निर्णय राज्य सरकारवर ढकलला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा चेंडू राज्यसरकार केंद्राकडे व केंद्र राज्य सरकारकडे टोलवत असून जनतेची दिशाभूल चालली आहे. या टोलवाटोलवीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सरकारला जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर त्यांना कर्जमाफीचा निर्णय घ्यावाच लागेल व जोपर्यंत निर्णय होत नाही तोवर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, यावर विरोधी पक्ष ठाम असल्याचेही मुंडे यांनी वेळी स्पष्ट केले.
via Blogger http://ift.tt/2mauLq0
from WordPress http://ift.tt/2nNffNg
via IFTTT
No comments:
Post a Comment