Latest News

मतदारांच्या माहितीसाठी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राची प्रसिद्धी करणार – राज्य निवडणूक आयुक्त * आदर्श आचारसंहितेचे पालन करावे*

अमरावती (जिमाका) :-
 
 येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये मतदारांना योग्य उमेदवारांची ओळख होण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राची प्रसिद्धी मतदान केंद्राच्या बाहेर फ्लेक्सद्वारे तसेच वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून करणार आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये उमेदवारांनी नोंदविलेली स्थावर व जंगम मालमत्ता, शिक्षण आणि उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबतची माहिती नमुद करणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठात आयोजित निवडणूक पुर्वतयारी आढावा बैठकीत दिली.
यावेळी कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर, निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी किरण गित्ते व यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह, मनपा आयुक्त हेमंत पवार, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलिस अधिक्षक लखमी गौतम यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अमरावती विभागातील जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुक शांततेत, सुरक्षितपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहिम हाती घ्यावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी दिले.
उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र व नामनिर्देशनपत्र 100 टक्के ऑनलाईन भरण्यासाठी मदत केंद्र, सुविधा केंद्रांची सुविधा करुन परिसरातील इंटरनेट कॅफेची मदत घ्यावी. यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देवून त्यांच्या माध्यमातून उमेदवारांमध्ये जागृती करावी.
यावेळी बोलतांना निवडणूक आयुक्त म्हणाले की, महानगरपालिका निवडणूक क्षेत्रामध्ये सर्व मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र असावेत. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्या. त्याबरोबरच निवडणूकी दरम्यान उमेदवार करत असलेल्या दैनंदिन खर्चाचा गोषवारा सादर करावा किंवा संपुर्ण खर्च 30 दिवसाच्या आत सादर न केल्यास उमेदवारी रद्द करावी अशा सुचना जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना दिल्या. राजकीय पक्षांनी सुद्धा निवडणूकीचा खर्च वेळेत सादर करावा. निर्भय व पारदर्शकपणे निवडणूका पार पाडण्यासाठी सर्व कायदेशिर बाबींचा उपयोग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करावा. नाविण्यपूर्ण व कल्पक प्रयोगांना आयोगाचा पाठिंबाच राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. निवडणूकीमध्ये होणाऱ्या पैसा व दारूचा गैरवापर रोखण्यासाठी पोलिस व उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी निवडणूकीच्या पुर्वतयारीची माहिती दिली. यामध्ये निवडणूक विषयी संनियत्रण समिती स्थापन केली असल्याची माहिती दिली. दर्यापूर, अचलपूर व अमरावती हे तीन संवेदनशिल तालुके असल्याने निवडणूकीदरम्यान अतिरिक्त पोलिस बल आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यवतमाळ जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी गेल्या न.पा. निवडणूकीत जिल्ह्यातील दारू दुकाने तीन दिवस बंद ठेवल्याने निवडणूकीदरम्यान दारूचा गैरवापर थांबविता आला असल्याची माहिती दिली. संवेदनशिल भागातील मतदान केंद्रावर व्हिडिओ शुटिंगची व्यवस्था करावी अशा सुचना आयुक्तांनी दिल्या.
यावेळी विद्यापिठ परिसरात मतदार जागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला निवडणूक आयुक्तांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

via Blogger http://ift.tt/2i4qdh1




from WordPress http://ift.tt/2j2tZpO
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.