शिक्षणाचा हक्क अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के राखीव जागांवर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सोमवारी, दि. 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सोडत काढण्यात येणार आहे.
शिक्षण हक्क अधिनियम 2009, महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियमानुसार 2017-18 या सत्रात दुर्बल आणि वंचित घटकासाठी 25 टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. या जागांवर प्रवेशासाठी 193 शाळांची नोंदणी पुर्ण झाली आहे. संपूर्ण राज्यात 10 जानेवारीपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात 25 टक्के प्रवेशांतर्गत नर्सरीसाठी 1 हजार 94 जागा, तसेच पहिलीसाठी 647 अशा एकूण 1 हजार 741 जागा राखीव आहेत. यात 3 हजार 195 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत.
यातील प्रवेशाची पहिली लॉटरी सोमवारी जिल्हा परिषद सभागृह येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
अर्ज करताना पालकांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर लॉटरीचा दिनांक, निवड झालेल्या शाळेचे नाव, प्रवेशाचा कालावधी आदी माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकांनी student.maharashtra.gov.in मध्ये आरटीई पोर्टल संकेतस्थळावर लॉगईन-आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग ईन करून प्रवेश निश्चिती पत्राची प्रिंट काढून संबंधित शाळेत 7 ते 15 मार्च दरम्यान आवश्यक मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून प्रवेश घ्यावा लागणार आहे. या शाळेत कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. प्रवेश घेतला नसल्यास संबंधित विद्यार्थ्याला पुढील सोडतीमधून बाद करण्यात येणार आहे. प्रवेशामध्ये अडचण आल्यास पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या आरटीई हेल्प सेंटरशी संपर्क साधावा, याबाबतची माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नसल्यास उर्वरीत जागांसाठी सोडती काढण्यात येणार आहे. तसेच अंतिम सोडत एनआयसीतर्फे ऑनलाईन स्वयंचलित सोडत करण्यात येणार आहे. सोडतीवेळी नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
via Blogger http://ift.tt/2lHxrGq
from WordPress http://ift.tt/2mYryWh
via IFTTT
No comments:
Post a Comment